anandnagri logo
मुख्य बातम्या:

सर्वोत्तम कामगिरीसाठी सायना उत्सुक

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 11:08:00 am

फोटो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - बॅडमिंटन क्षेत्रातील प्रतिष्ठेची स्पर्धा मानल्या गेलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सायना नेहवाल उत्सुक झाली आहे. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेतून ती शंभर टक्के तंदुरुस्त झाली आहे.
या स्पर्धेस सात मार्चपासून प्रारंभ होत आहे. सायना हिने सांगितले, या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडू सहभागी होत असल्यामुळे तेथे क्षमतेच्या शंभर टक्के कामगिरी करण्यावर माझा भर राहणार आहे. 2015 मध्ये मी या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. माझ्या विजेतेपदात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरीन हिचा प्रमुख अडथळा राहणार आहे. दोन वर्षांपूर्वी तिनेच मला अंतिम लढतीत हरविले होते. यंदाही तिचेच प्रमुख आव्हान असणार आहे. अर्थात, यंदा मी खूप सराव केला आहे तसेच शारीरिक तंदुरुस्तीवरही भर दिला आहे.
रिओ ऑलिम्पिकनंतर सायना हिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यानंतर तिने काही स्पर्धामध्येही भाग घेतला होता. सुरुवातीच्या काही स्पर्धामध्ये तिला चांगले यश मिळाले नाही. मात्र मलेशियन मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद मिळवीत तिने अपेक्षा उंचावल्या आहेत. ऑल इंग्लंड स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी व पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी तिने सय्यद मोदी चषक स्पर्धेतून माघार घेतली होती.
सायना म्हणाली, मलेशियन मास्टर्स स्पर्धेपूर्वी मला अपेक्षेइतकी कठोर मेहनत करता आलेली नाही. अर्थात, तेथील सर्वोच्च यशामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. इंग्लंडमधील स्पर्धेसाठी विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मी खूप मेहनत केली आहे. तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे उमेंद्र राणा यांचीही मला खूप मदत झाली आहे. फिजिओ अरिवद निगम यांनीही माझी तंदुरुस्ती शंभर टक्के राहावी यासाठी माझ्याकडून पूरक व्यायाम करून घेतला आहे, त्यामुळे यंदा मला चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या सायनास ऑल इंग्लंडमधील पहिल्या लढतीत गतविजेत्या नोझोमी ओकुहारा या जपानच्या खेळाडूशी गाठ पडणार आहे. ओकुहारा हिला गतवर्षी खांद्याच्या दुखापतीस सामोरे जावे लागले होते. तिच्या खांद्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920