anandnagri logo
मुख्य बातम्या:

अर्धापूर - मालेगाव महामार्गावर ट्रकमधील चार लाखाचा गुटखा पकडून नष्ट

By आनंदनगरी वेब टीम | Tue 17-01-2017 | 12:50:53 pm

नांदेड  (वृत्तसंस्था)-अर्धापूर ते मालेगाव महामार्गावर ट्रकमधील अवैधरीत्या जाणारा चार लाख रुपये किमतीचा गुटखा पकडून नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. यात एक ट्रक व दोन आरोपी अर्धापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
वजिराबाद पोलीस ठाणे, येथे नोंद असलेल्या खुनाचा तपास करण्यासाठी गुरुवारी गुन्हे शाखेचे पथक अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीतील भोकरफाटा परिसरात आले होते. दरम्यान त्यांना चोरट्या मार्गाने अवैध गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक क्र. एपी - 29 टीसी 0498 मधून भोकरफाटा मार्गे येत असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती.
यावर पोलिसांनी पाळत ठेवून भोकर फाटा येथून भरधाव वेगात जाणाऱ्या या ट्रकचा पाठलाग करुन त्यास अर्धापूर - मालेगाव रोडवर पकडले. त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ गुटखा ( गोवा 1000 ) चे 40 पोते मिळून आले. त्याची बाजारात 4 लाख 20 हजार रुपये किंमत असून वाहनासह मुद्देमाल अर्धापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. याबाबत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद डिघोळे यांनी तक्रार दाखल केली आहे.त्यानंतर या पथकाने अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावरुन अन्न सुरक्षा निरीक्षक सचिन केदारे, संतोष कनकावाड नमुना सहाय्यक अमरसिंह राठोड यांनी सदर मुद्देमालाची तपासणी केली. गुन्हे शाखेच्या पथकाने व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन हा मुद्देमाल अर्धापूर वळण रस्त्यावर जाळून नष्ट केला. पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद दिघोरे, दशरथ जांभळीकर, सदाशिव आव्हाड, तानाजी येळगे, तानाजी मुळके, राजु पांगरीकर, सुधाकर कदम यांनी कामगिरी बजावली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अन्न सुरक्षा निरीक्षक सचिन केदारे हे करित आहेत. राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असताना अर्धापूर शहरात मात्र गुटख्याची मोठी साठवण होत आहे. येथून शेजारी असलेल्या वसमत, बाळापूर, तामसा, हदगाव, औंढा आदी ठिकाणी गुटख्याचा पुरवठा केला जातो. शहरासह तालुक्यातील लहान - मोठी दुकाने व पानटपऱ्यावर राजरोसपणे गुटखा विक्री होत आहे. या गंभीर बाबीकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत वेळोवेळी अन्न सुरक्षा विभागाला माहिती दिल्यानंतरही गुटखाबंदी होत नाही. त्यामुळे जनतेत उलट - सुलट चर्चा होत आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920