anandnagri logo
मुख्य बातम्या:

तापावरील घरगुती उपचार

By आनंदनगरी वेब टीम | Tue 17-01-2017 | 12:22:26 pm

फोटो


ताप हा अगदी सामान्य आजार असला, तरी ताप शरीरातील सर्व ऊर्जा शोषून घेतो आणि आपल्याला अशक्तपणा जाणवू लागतो. भूक लागत नाही. डोळे लाल होतात. असा ताप संक्रमित ताप असू शकतो. सुप्तावस्थेत घशात राहणारे या आजाराचे विषाणू थंड वातावरण लाभताच सक्रिय बनतात. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत असल्याने विशेष खबरदारी घेण्याची गरज असते.
विषाणूंच्या संक्रमणामुळे येणाऱ्या तापाला संक्रमित ताप (व्हायरल फिव्हर) असे म्हणतात. संक्रमित तापाचे विषाणू घशात सुप्तावस्थेत निष्क्रिय राहतात. थंड वातावरणाशी संपर्क आल्यास किंवा फ्रिज मधील पाणी, कोल्ड्रिंक प्यायल्यास विषाणू सक्रिय होतात आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला चढवितात. अशा प्रकारचा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे आणि जलदपणे फैलावतो. श्वासांद्वारे एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे जंतू संक्रमित होतात. विषाणू संक्रमित झाल्यावर एक-दोन दिवसांनी किंवा काही व्यक्तींच्या बाबतीत काही तासांतच ताप चढू लागतो. लहान अर्भकांच्या दृष्टीने संक्रमित ताप अधिक तापदायक ठरतो. यामुळे मुलांची त्वचा पिवळसर पडते तसेच त्यांना श्वसनात आणि स्तनपानात अडचणी येऊ लागतात. याखेरीज अर्भकाला न्यूमोनियासारखे आजारही जडू शकतात. इतर आजारांच्या विषाणूंबरोबरच जर संक्रमित तापाचे विषाणू शरीरात गेले, तर अशा रुग्णाची अवस्था अधिकच बिकट होते. उदाहरणार्थ, खोकला सुरू असताना तापाचे विषाणू शरीरात गेले तर अधिक त्रास जाणवतो. त्यामुळे इतर आजार झालेल्या किंवा क्षयरोग जडलेल्या व्यक्तींनी संक्रमित तापापासून बचाव करायला हवा. 
संक्रमित तापाची लक्षणे
डोळे लाल होणे, शरीराचे तापमान 101 ते 103 अंशांपर्यंत वाढणे, खोकला आणि सर्दी होणे, नाक वाहणे, सांधेदुखी आणि सांधे सुजणे, थकवा आणि घसादुखी, अंगदुखी, भूक न लागणे, झोपल्यानंतर उठताना थकवा जाणवणे, डोकेदुखी अशी लक्षणे संक्रमित तापाची असू शकतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याने संक्रमित ताप येतो. रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती चांगली असेल तर हा ताप सहसा येत नाही.
काय करावे?- संक्रमित ताप हा नेहमीच्या तापा सारखाच असल्याने चटकन् ओळखू येत नाही. त्यामुळे ताप येताच डॉक्टरांकडे जाणे चांगले. तपासणीअंती हा संक्रमित ताप आहे की नाही, हे समजू शकते. संक्रमित ताप असल्याचे निष्पन्न झाल्यास काही पथ्ये पाळावी लागतात. ताप जर 102 अंशांपर्यंत असेल आणि अन्य कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नसतील, तर घरच्या घरी रुग्णाची देखभाल करता येणे शक्य असते. रुग्णाच्या माथ्यावर साध्या पाण्याच्या पट्‌ट्या ठेवाव्यात. पट्टी ठेवल्यानंतरही डोक्याचे तापमान कमी होत नसेल, उलट पट्टी गरम होत असेल तर एक पट्टी एका मिनिटापेक्षा अधिक काळ ठेवू नये. डोक्याबरोबरच संपूर्ण शरीर गरम होत असेल तर स्वच्छ कापड स्वच्छ पाण्यात बुडवून पिळून घ्यावे. या ओल्या कापडाने संपूर्ण शरीर पुसून काढावे. रुग्णाला दर सहा तासांनी पॅरासिटामोलची एक-एक गोळी देत राहावे. मात्र, याव्यतिरिक्त दुसरी कोणतीही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज घेऊ नये. मुलांना त्यांच्या वजनाच्या प्रमाणात प्रत्येक किलोमागे दहा मिली पॅरासिटामोल देत राहावे. दोन दिवसांत ताप उतरला नाही, तर मात्र डॉक्टरांकडे जायलाच हवे.
संक्रमित तापाचा रुग्ण घरात असताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. संक्रमणाचा धोका असल्याने रुग्णापासून इतरांनी शक्यतो दूरच राहावे. रुग्णाला पूर्ण आराम मिळायला हवा. विशेषतः ताप जास्त असल्यास विश्रांतीची गरज अधिक असते. विश्रांतीही तापाच्या काळात औषधाचेच काम करते. रुग्णाने शिंकण्यापूर्वी नाक आणि तोंडापुढे रुमाल धरावा. संक्रमित तापावर 
आजाराचे प्रमाण लक्षात घेऊनच डॉक्टर इलाज करतात. मात्र, रुग्णाला योग्य प्रमाणात ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट देणे ही रुग्णांच्या नातेवाइकांची जबाबदारी असते. शरीराच्या तापमानात अचानक बदल झाल्यास किंवा संक्रमणावस्थेत अधिकांश रुग्णांना ताप येतो. मोसम बदलताच होणारा असाच एक संक्रमित तापही असतो. अशा तापात मात्र प्रतिजैविके आणि काही ओव्हर-द-काऊंटर (ओटीसी) औषधांचा आधार घेतला जातो; परंतु डॉक्टरकडे जाण्यापूर्वी काही घरगुती उपचार आजमावून संक्रमित ताप कमी किंवा पूर्णपणे बराही करता येतो. संक्रमित तापासाठी नैसर्गिक उपचार सुरक्षित आणि सुलभरित्या उपलब्धही आहेत. यातील काही घरगुती उपचारांविषयी जाणून घेऊ या.
1. धन्याचा चहा ः धन्याचे दाणे शरीराला जीवनसत्वे देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात. तसेच धन्यात प्रतिजैविकेही असतात आणि ती संक्रमित तापाशी लढण्याची ताकद देतात. एक ग्लास पाण्यात एक मोठा चमचा धन्याचे दाणे घेऊन उकळावे. त्यानंतर थोडे दूध आणि साखर घालावी. झाला धन्याचा चहा तयार! हा प्यायल्यास संक्रमित तापाच्या अवस्थेत खूपच आराम मिळतो.
2. तुळशीचा काढा ः संक्रमित तापाच्या आजारात सर्वाधिक प्रभावी आणि सर्वत्र वापरे जाणारे घरगुती औषध म्हणजे तुळशीच्या पानांचा काढा. विषाणूविरोधी, बॅक्टेरियानाशक, जैविक विषाणूविरोधी असे तुळशीच्या पानांमधील गुण संक्रमित तापाच्या आजारात खूपच उपयोगी पडतात. अर्धा ते एक चमचा लवंग पावडर आणि तुळशीची सुमारे वीस ताजी, स्वच्छ पाने एक लिटर पाण्यात एकत्र करून उकळावीत. पाणी अर्धे होईपर्यंत आटवावे. हा काढा दर दोन तासांनी सेवन केल्यास ताप कमी होतो.
3. तांदळाची कांजी ः तांदळाची कांजी हा पारंपरिक उपचार शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहे. संक्रमित तापाच्या आजाराने त्रस्त लहान मुलांना विशेषतः ही कांजी दिली जाते. अर्थात, प्रौढांसाठीही ती तितकीच उपयुक्त आहे. एक भाग तांदूळ व अर्धा भाग पाणी एकत्र करून अर्धवट शिजेपर्यंत आचेवर ठेवावे. नंतर पाणी काढून चवीप्रमाणे 
मीठ घालून गरम-गरम खावे.  तापाच्या आजारात यामुळे बराच आराम मिळतो. 
4. सुंठीचा काढा ः सुकवलेले आले अर्थ सुंठीमध्ये अँटी फ्लेमेबल, अँटी ऑक्सिडेन्ट आणि संक्रमित ताप बरा करणारे अनेक गुण असतात. मधाबरोबर सुंठ घेतल्यास बराच आराम मिळतो. तसेच सुंठीचा काढाही करता येतो. एक कप पाण्यात मध्यम आकाराचे सुंठीचे दोन तुकडे टाकावेत. सुंठ पावडरीचा वापर केला तरी चालेल. यात थोडी हळद, काळी मिरी आणि साखर टाकून उकळावे. हा काढा दिवसातून चार वेळा थोडा-थोडा घ्यावा. 
5. मेथीचे पाणी ः मेथीचे दाणे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतातच. या दाण्यांमध्ये डायेसजेनिन, सपोनिन्स, एल्कलॉइड असे औषधी गुण असतात. तापाबरोबरच अनेक आजारांमध्ये मेथीच्या दाण्यांचा उपयोग केला जातो. संक्रमित तापावरील औषधासाठी मेथीचे एक मोठा चमचा दाणे अर्धा कप पाण्यात रात्री भिजवून ठेवावेत. सकाळपासून नियमित अंतराने हे मिश्रण घेत राहावे. मेथीचे दाणे, लिंबू आणि मधाचे मिश्रणही तापावर उपयोगी पडते. 
वरील उपचार घरगुती स्वरूपाचे असून, यामुळे ताप न उतरल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायलाच हवी. तसेच डॉक्टरांनी सांगितलेली औषधेच घ्यायला हवीत.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920