anandnagri logo
मुख्य बातम्या:

चला फटाकेमुक्त दिवाळीचा  संकल्प करु या !!!

By आनंदनगरी वेब टीम | Thu 20-10-2016 | 11:39:54 pm


दिवाळी सण मोठा... नाही आनंदाला तोटा... असे आपण म्हणतो. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देणाऱ्या या सणाची खासियत काही औरच.. दारासमोरची रांगोळी, आकाशकंदील, फराळ यामुळे दिवाळीच्या चार दिवसांमध्ये उत्साह द्विगुणीत होतो. मात्र आता या सणात फटाक्यांच्या वापरामुळे आता प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवाळी आणि फटाके हे समीकरण एकमेकांशी घट्ट असल्याने फटाक्यांशिवाय दिवाळी साजरीच होऊ शकत नाही, हे सत्य असले तरीही आता प्रदूषणाची समस्या पाहता दिवाळीत फटाक्यांचा अट्टाहास नको अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.
केवळ दिवाळीच नव्हे तर कोणतेही सण साजरे करण्यासाठी फटाक्यांचा आधार घेतला जातो. संपूर्ण देशभरात दिवाळी हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो. अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणाऱ्याचा संदेश देणाऱ्या या सणाच्या नावातच प्रसन्नता आहे. पूर्वी विकासाच्या पल्ल्याआड दडलेल्या भारतात जेव्हा वीज ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती, तेव्हापासून सर्वत्र प्रकाश यावा, या हेतूखातर सर्वत्र दिवे, आकाशकंदील लावले जात. कालांतराने प्रकाश तेजोमय दिसावा म्हणून फटाके फोडण्याची प्रथा रूढ झाली. नंतर जल्लोषाच्या नावाखातर मोठमोठ्या आवाजात फुटणारे फटाके, सुतळी बॉम्ब यांचा धुमाकूळ सुरू झाला.
गेल्या काही वर्षांपासून आवाजी फटाके कमी झाले असून आकाशात सप्तरंगाची उधळण करणाऱ्या ध्वनीविरहित फटाक्यांची मागणी वाढली आहे. पण त्या फटाक्यांमुळे कानठळ्या बसत नसल्या तरी वायुप्रदूषण मात्र होत आहे. नाक, डोळे, घसा आणि फुप्फुसांना त्याचा त्रास सोसावा लागतो. नुकतीच घरगुती शोभेची दारू तयार करताना झालेली दुर्घटना किंवा या अगोदर फटाक्यांमुळे झालेल्या दुर्घटनांमुळे झालेली जीवितहानी, वित्तहानी फटाक्यांचे दुष्परिणामच ठळकपणे अधोरेखित करतात. मुळात दिवाळीचा खरा आनंद हा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करूनच मिळवायला हवा. मोठ्या कर्कश्श आवाजाच्या फटाक्याने बहिरेपणा येऊ शकतो. माणसांप्रमाणे पशु-पक्ष्यांनाही फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचा त्रास होतो.
दिवाळीत फटाके फोडण्याची जणू स्पर्धाच लागते. यामुळे प्रदूषण होऊन आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात, हे माहीत असूनही अनेक लोक फटाके फोडतात. फटाक्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका अशी मांडली की, विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शिक्षक हे गुरु असतात. आणि विद्यार्थी शिक्षकांचे ऐकतात म्हणूनच विद्यार्थ्यांनी फटाके विकत घेऊ नयेत आणि ते उडवू नयेत यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिल्या आहेत. याबरोबरच शिक्षकांनी फटाक्यांचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगावेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे. दिवाळीत कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांनी रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो, फटाक्यांच्या आतषबाजीनंतर मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायुप्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे फटाके फोडण्यावर कायमची बंदी घालावी किंवा सायंकाळी 7 ते रात्री 9 या दोन तासांचाच कालावधी फटाके फोडण्यासाठी ठरवून द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून याबाबत शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. राज्य सरकारनेही शिक्षकांना या कामासाठी प्रोत्साहित करावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून तातडीने जनजागृती सुरू करावी, फटाक्यांमुळे मानवी आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, याबद्दल महिती देण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आजच्या घडीला फटाक्यांमुळे होणाऱ्या वाईट परिणामांबाबत जागृती करणे नितांत गरजेचे आहे. शालेय स्तरापासून प्रदूषणाबाबत जागृती करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. वाढत्या प्रदूषणाचा विचार केला असता दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करण्याशिवाय पर्याय नाही. सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आवाजविरहित फटाके वाजवून पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज आहे.
फटाक्यांमुळे हवेत कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन-मोनॉक्साइड, फॉस्फरस यासारखे विषारी वायू पसरल्याने हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. परिणामी, श्वसन, घसा, फुप्फुस व दमा यांचे विकार वाढतात. कर्ण कर्कश्श आवाजामुळे लहान बालकांच्या कानांचे पडदे फाटून बहिरेपणा, डोळ्यांवर फटाका उडाल्यास डोळ्यांना इजा पोहोचून अंधपणा येण्याची शक्यता असते. वृद्ध व आजारी रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागत असून विषारी धुरामुळे मोकळा श्वास घेणे मुश्कील होत आहे. पक्षी आवाजाने घरट्यातून उडून जातील, फुलबाजांच्या तापलेल्या तारांवर पाय पडून छोट्या मुलांना इजा होण्याची शक्यता असते. रॉकेटसारखा फटाका आगीस निमंत्रण देण्याची शक्यता असल्याने वित्तहानी व जीवितहानी टाळण्यासाठी फटाक्यांचे दुष्परिणाम पाहता ते फोडणे धोकादायकच आहे. वास्तविक आनंद देण्याने वाढतो, वाढल्याने तो पसरतो. दिवाळी हा मौजमजेचा सण नसून धार्मिकता आणि संस्कृती जपण्याचा सण आहे. दिवाळीदरम्यान फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. एकंदरीतच आवाज करणाऱ्या आतषबाजीमुळे निसर्गासह मनुष्यप्राण्यालाही हानी पोहोचत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फतही दिवाळीदरम्यानच्या प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्यात येते. पर्यावरणाची हानी रोखण्यासह शांतता क्षेत्रात ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत प्रयत्न करण्यात येतात. आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आवश्यकता नसते. ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके हे स्वतःला तसेच इतरांनाही त्रासदायकच असतात. म्हणूनच शहरातील वाढती गर्दी व वस्त्या पाहता, आता पर्यावरणाला बाधा न आणता त्याचे रक्षण करत, शांततामय दिवाळी साजरी करणे ही काळाची गरज आहे असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे.-वर्षा फडके,
वरिष्ठ सहायक
 संचालक.
 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920